अवकाळीचा तडाखा : कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान; परभणीतील २२ मंडळामध्ये अतिवृष्टी
ओढे, नाले तुडुंब, नद्यांना पाणी
परभणी : जिल्ह्यात सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस झाला. परभणी, पूर्णा आणि जिंतूर तालुक्यासह ५२ पैकी २२ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे खरीपातील कापूस, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे
शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरण परिसरात ६४ मिलीमीटर, तर येलदरी (ता.जिंतूर) धरण परिसरात ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुधना धरणांमध्ये एक दलघमी पाण्याची आवक झाली आहे. सकाळी १०.५० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. परभणी, जिंतूर, मानवत व गंगाखेड तालुक्यात सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. पहाटे विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस तसेच तूर व इतर पिकांची प्रचंड हानी झाली आहे. चार दिवसांपूर्वीच हवामान विभागाने जिल्ह्यात जोरदार पावसासह काही भागात गारपिटीचा इशारा दिला होता. वातावरणातील बदलाने तापमानात मोठी घट झाली होती. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू होऊन जोरदार वारे वाहू लागले. मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिंतूर तालुक्यातील चारठाणा तसेच सेलू तालुक्यातील रायपूर, साळेगाव, हातनूर, वालूर परिसरात बोरगाव, शेलवाडी, राजुरा, मापा, केमापूर आदी परिसरात अवकाळी पावसाने ज्वारीचे पिक आडवे झाले. तुरीलाही मोठा फटाका बसला. जिंतूर तालुक्यातील येलदरी, मुरूमखेडा, केहाळ, सावळी, इटोली, सावंगी म्हाळसा, वरखेडा आदी भागात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सखल शेतजमीनीत पाणी साचल्यामुळे गहू व हरबरा पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील ओढे व नाले पाण्याने भरून वाहिले. मानवत, परभणी व सेलू तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीसह लहान मोठ्या नद्यांना पाणी आले आहे. कुपटा परिसरात बंधारे भरले आहेत. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरात पहाटे दोन वाजल्यापासून पाऊस झाला. कापूस, गहू, हरभरा पिकांत पाणी साचले आहे. फुलोऱ्यातील तुरीचेही नुकसान झाले आहे. यंदा पावसाअभावी कापूस सोयाबीनची उत्पादकता ५० टक्क्यांनी घटली. त्यातच अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)
परभणी : ६८.४, गंगाखेड ४१.१, पाथरी ६०.९, जिंतूर ९३.४, पूर्णा ८१.२ पालम ५२, सेलू ६१.९, सोनपेठ ३८.७, मानवत ५९.२
जिल्हाधिकारी बांधावर..
दरम्यान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोमवारी बांधावर जाऊन अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परभणी तालुक्यातील बलसा, पिंगळी येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकाची नुकसानीची पाहणी केली व जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित तलाठी मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांना दिलेत. जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे अन्य अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली. परभणी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकरी यावेळी उपस्थित होते
या महसूल मंडळात झाली अतिवृष्टी
परभणी तालुक्यातील परभणी : १०२.५ मिलीमीटर, जांब : ७०.८, झरी : ७२, सिंगनापूर : ७६.३, पिंगळी : ७६, जिंतूर तालुक्यातील जिंतूर : १२९.८, सावंगी : ८४, बामणी : ८२, बोरी : ८८.८, आडगाव : १०२.८, चारठाणा : ७५.५, वाघी धानोरा : १००.८, दुधगाव : ८३.३, पूर्णा तालुक्यातील पूर्णा : ९७.८, ताडकळस : ९१.८, लिमला : ६८.३, कातनेश्वर : ७५, चुडावा : ९४.५, सेलू तालुक्यातील देऊळगाव गात : ७६.८, कुपटा : ९४.५, मानवत तालुक्यातील कोल्हा : ७६.८, रामपूरी : ६९