Pension Ki Tension : पेन्शनसाठी गुरूजींना हेलपाटे

Pension Ki Tension : पेन्शनसाठी गुरूजींना हेलपाटे

महालेखाकार कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे सेलूतील तिघे त्रस्त

‘एजी’ नागपूर कार्यालयाने मंजुरी आदेशावर नावातील ‘एम’अक्षरच गाळले. यामुळे अंशदान रक्कम व निवृत्ती वेतन मंजूर होऊनही मिळू शकले नाही. याचा नाहक मानसिक त्रास सोसावा लागत आहे. आर्थिक अडचणीत आलो आहे. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. – माणिक हजारे, सेवानिवृत्त शिक्षक

परभणी : सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील शिक्षक माणिक हजारे यांच्या निवृत्ती वेतन आदेशावर इंग्रजीतील ‘एम’ अक्षर गाळले गेले. गेल्या नऊ महिन्यांपासून हजारे यांचे निवृत्ती वेतन नाही. तर याच शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक सुभाष नावकर तसेच श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील सुरेखा रामदासी यांचेही निवृत्ती वेतन मामुली त्रुटींमुळे सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
शिक्षक माणिक आश्रोबा हजारे ३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. २० जुलैरोजी त्यांना अंशदान रक्कम १० लाख २६ हजार ३०० रुपये व निवृत्त वेतन दरमहा ३१ हजार १०० रुपये मंजूर देखील झाले. सदर आदेशावरील इंग्रजी नावात माणिक आश्रोबा हजारे ऐवजी नावातील ‘एम’ अद्याक्षर वगळले गेले व आणिक आश्रोबा हजारे या नावाने सेवानिवृत्ती वेतन मंजूर करण्यात आले. नावातील चुकीमुळे हजारे यांना अंशदान रक्कम मिळू शकली नाही. वेतनही सुरू झाले नाही. १२ ऑक्टोबररोजी दुरुस्तीबाबत संबधित कार्यालयाकडे पत्र व्यवहार केला.‌ मात्र, अद्यापही त्यांना सुधारित आदेश प्राप्त झाला नाही. दरम्यान, याच शाळेतील मुख्याध्यापक सुभाष देवराव नावकर ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. तर नूतन कन्या प्रशालेतील शिक्षिका सुरेखा पद्माकर रामदासी ३० एप्रिलरोजी निवृत्त झाल्या. या दोघांच्याही प्रस्तावामध्ये ‘संस्थेला शंभर टक्के अनुदान कधी प्राप्त झाले ?’ अशी त्रुटी काढण्यात आली. रामदासी यांच्याबाबत दोन वेळा हीच त्रुटी काढण्यात आली. याबाबत शाळा प्रशासनाने दिलेले पत्र महालेखाकार कार्यालयाला पाठविण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपासून दोघांचे निवृत्ती वेतन रखडले आहे. तीनही कर्मचार्‍यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

‘टोल फ्री’ची टोलवाटोलवी…

दरम्यान, संस्था, शाळा व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून योग्य पद्धतीने निवृत्ती वेतनासंबंधी सहकार्य केले जात आहे. मात्र, नागपूर महालेखाकार कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. नागपूरच्या पेन्शन विभागाच्या दूरध्वनी तसेच टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही. टोलवाटोलवी सुरू असते. यामुळे निवृत्ती वेतनधारक त्रस्त झाले आहेत.

सेवानिवृत्ती होणार्‍या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती अंशदान व वेतन प्रस्ताव तीन महिने अगोदर पाठविले गेले पाहिजेत. शाळा संहितेत तसा नियम आहे. मात्र, या संदर्भात निवृत्त वेतन रखडल्याबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत. महालेखाकार कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. – यशवंत मकरंद, जिल्हाध्यक्ष, मराठवाडा शिक्षक संघ, परभणी


Telangana Election : आमदार मेघना बोर्डीकरांच्या शेरलिंगमपल्लीमध्ये रॅली

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!