सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांना कोर्टाची नोटीस
औरंगाबाद : मुलाच्या जन्म प्रमाणपत्राची माहिती देण्याचे माहिती आयोगाचे आदेश असतानाही माहिती दिली नाही. त्यामुळे दाखल झालेल्या रिट याचिकेत सेलू (जि.परभणी) नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.
याचिकाकर्ता समीउद्दीन कमरोद्दीन काझी यांनी त्यांचा मुलगा अरमान समीउद्दीन काझी याची जन्माची नोंद चिखली नगर परिषद (जि. बुलढाणा ) येथे करून मुलाचे जन्म प्रमाणपत्र घेतले होते. कौटुंबिक वाद असल्याने त्यांचे सासरे हमीद खान शेरखान यांनी पुन्हा सेलू नगर परिषद (जि. परभणी) येथे अर्ज करून अरमानचे दुसरे जन्म प्रमाणपत्र मिळवले.
याचिकाकर्ता समीउद्दीन कमरोद्दीन काझी यांनी सेलू नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज देऊन दुसरी नोंद कुठल्या प्रमाणपत्राच्या आधारे केली आहे याची माहिती मागवली. माहिती मिळाली नसल्याने त्यांनी दुसरे अपील केले व माहिती आयोगात धाव घेतली. माहिती आयोगाने काझी यांच्या बाजूने निकाल दिला. तरीही माहिती मिळाली नसल्याने त्यांनी ॲड. फारूकी कमालोद्दीन एन. यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करुन शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली होती. पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड.फारूकी कमालोद्दीन आणि राज्य सरकारतर्फे ॲड डी.आर.काळे यांनी काम पाहिले.
वाचा : अन्य बातम्या :
स्फूर्तिदायक : क्रांतिकारकांचे स्मरण नित्य करा ; जयप्रकाश बिहाणी
कॉंग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला गंगाखेडातून जल्लोषात सुरुवात