MIDC : सेलूतील एमआयडीसी, टेक्सटाईल पार्कला गती द्या; कृती समितीची मागणी
सेलू तालुका विकास कृती समितीचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना निवेदन
सेलू, जि.परभणी : सेलू येथे होऊ घातलेला औद्योगिक वसाहत (MIDC) व टेक्सटाइल पार्क प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी सेलू तालुका विकास कृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बुधवारी, ९ नोव्हेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले. कृती समितीचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, सचिव डॉ.विलास मोरे, विजय मंत्री, चंद्रशेखर मुळावेकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर आदींची उपस्थिती होती.
सेलूचा एमआयडीसी प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी सेलू शहराजवळील हदगाव खुर्द, रवळगाव, पिंप्रुळा या गावाच्या परिसरातील जागा मंजूर करण्यात आलेली आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून या संदर्भात प्रसार माध्यमांतून सकारात्मक किंवा नकारात्मक बातम्या माध्यमातून येत आहेत. त्यातून एमआयडीसी व टेक्सटाईल प्रकल्पाबाबत शासनाची सकारात्मक भूमिका दिसून येत आहे. केवळ भूसंपादनाच्या अडथळ्यामुळे सदरील योजनेला गती मिळत नाही, असे दिसून येते. संपादित करावयाच्या शेतजमीनधारक शेतकर्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत सकारात्मक संवाद करून मार्ग काढणे, योग्य राहील, असे वाटते या बाबतीत प्रशासनाला सेलूकरांचे सर्वतोपरी सहकार्य राहील. त्यामुळे तया प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यकती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातमी : सेलूतील एमआयडीसी : इतरत्र हलविण्याच्या हालचालींना वेग ?