संगीत महोत्सव : चारठाणकर संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन, रसिकांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी /बाबासाहेब हेलसकर
सेलू येथील साई नाट्यमंदिरात आयोजित दोन दिवसीय संगीतरत्न पं. हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. रात्री उशिरापर्यंत मैफलीचे सत्र सुरूच होते. या वेळी माजी सभापती अशोकनाना काकडे, गोविंदभाऊ जोशी, प्राचार्य विनायकराव कोठेकर, महेश खारकर, जयप्रकाश बिहाणी, संतोष कुलकर्णी, रामराव रोडगे ,किशोर जोशी, दत्तराव पावडे,प्राचार्य शरद कुलकर्णी, यशवंत चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अपस्तंभ यांचा श्रवणीय बागेश्री!
उद्घाटनानंतर पुणे येथील जयश्री जोशी शिरशीकर यांचे गायन झाले.त्यांनी राग पुरिया धनश्री सादर केला.त्यांना हार्मोनियम साथसंगत सौरभ कान्हेकर तर तबला स़गत शिवाजीराव पाठक यांची होती. त्यानंतर पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य कोलकत्ता येथील आय.टी.सी शिष्यवृत्तीधारक नांदेड येथील युवा गायक अभिजित अपस्तंभ यांचे गायन झाले. त्याने राग “बागेश्री”गायला.’कौन गत भयी’ निलंबीत ख्यालात त्याने विलक्षण ताकदीने आलापी करीत आपल्यातल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. सुस्पष्ट बोलताना,गमकयुक्त ताना हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य सांगता येईल.त्यानंतर त्यांनी चारुकेशीतील ‘विष्णमय जग वैष्णवांचा धर्म’ हा संत तुकोबांचा अभंग सादर केला.अपस्तंभ यांना नेटकी साथसंगत मंगेश जवळेकर,प्रशांत गाजरे यांची होती.
सारंगी तबल्याची जुगलबंदी..
बनारस घराण्याचे विख्यात वादक संगीत मिश्रा यांच्या सारंगी वादनाने महोत्सवात बहार आणली. मुळचे मराठवाड्यातील परंतू पुण्यात वास्तव्याला असणा-या तबलावादक हनुमंत फडतरेशी त्यांची जुगलबंदी उत्तरोत्तर रंगत गेली.अतिशय प्रतिभासंपन्न या वादकाने प्रस्तुती करतात आपले सर्वस्व पणाला लावले. सुरूवातीला राग वाचस्पती सादर केला. त्यानंतर त्यांनी सादर केलेला बनारसी झुला केवळ अप्रतिम म्हणावा लागेल. वादना बरोबरच त्याचे शब्द देखील गावून दाखविल्यामुळे श्रोत्यांना अधिक आनंद घेता आला.
प्रसाद खापर्डे यांचा जोगकंस.
पहिल्या दिवसाच्या महोत्सवाची सांगता उस्ताद राशिदखान यांचे शिष्य विख्यात गायक प्रसाद खापर्डे(पुणे) यांच्या गाण्याने झाली.जोगकंस सारखा उत्तरांगप्रधान रागाची त्यांनी अतीशय ताकदीने प्रस्तुतीकरण करीत रसिकांची दाद मिळविली. साथसंगत करणारे शांतीभुषण चारठाणकर (हार्मोनियम)तर प्रशांत गाजरे(तबला) यांनी साजेशी साथसंगत करीत मैफलीत रंग भरला. “साजन मोहे घर आयो”दृत तालात जुगलबंदी श्रवणीय अशी होती. महोत्सवात सहभागी कलावंतांचा परिचय कु.बागेश्री देशमुख यांनी तर शेवटी आभार श्रीकांत उमरीकर यांनी मानले.
आज सांगता
२५ डिसेंबर रोजी स्थानिक कलावंत यशवंत चारठाणकर यांच्या गायनाने सुरू होईल. रामभाऊ बोरगांवकर(लातूर)यांचे तबला सोलो वादन होईल. औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन गुरूकुलातील कलावंत शितल भाबरे, राधा जहागीरदार,सिद्धी सोनटक्के या कत्थक शास्त्रीय नृत्य सादर करतील. महोत्सवातील शिखरमैफिल प्रसिद्ध गायक पं.रघुनंदन पणशीकर(पुणे)यांची होईल. महोत्सवात साथसंगत करण्यासाठी शांती भूषण चारठाणकर, मंगेश जवळेकर, सौरभ कान्हेकर,प्रशांत गाजरे, हनुमंत फडतरे, अविनाश पाटील,शिवाजी पाठक सहभागी होत आहेत. महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
मराठा आरक्षण : न्यायालयात टिकणारे आरक्षण द्या : अर्जुन तनपुरे यांचे मत
NCP : जयंतराव पाटलांचे निलंबन मागे घ्या; सेलूतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी