वेगळी वाट : माजी नगरसेवक रहिमखाँ पठाण यांनी राष्ट्रवादी सोडली; के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षात रविवारी प्रवेश
पत्रकार परिषदेत माहिती : नगरपालिका निवडणुकीत सक्षम पर्याय उभा करणार
सेलू : काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस असा राजकीय प्रवास अनुभवले माजी नगरसेवक रहीमखॉं खैरुल्लाखॉं पठाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात केलेल्या विकासाभिमुख कार्याने आपण प्रभावित झालो असून. राव यांच्या भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षात पाचशे कार्यकर्त्यांसह रविवारी नांदेड येथे प्रवेश करणार आहोत, असे पठाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. स्थानिक प्रस्थापितांच्या ‘पैसा लावा व पैसा कमवा’ या धोरणाला शह देऊन, सेलू पालिका निवडणुकीत सक्षम पर्याय उभा करणार असल्याचे सांगत मोर्चबांधणीला सुरूवात करणार असल्याचे संकेत दिले.
पठाण म्हणाले, की मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात केलेल्या रोजगार निर्मिती, विदेशातील तंत्रज्ञान वापरून केलेले पाणी व्यवस्थापन, अपंग, विधवा, पीडीत; तसेच दलित व वंचित घटकासाठी केलेले उल्लेखनीय कार्य अशा सर्वांगीण विकासाभिमुख प्रशासनाने आपण प्रभावीत झालो आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार आहोत. सर्व सामान्य मतदारांनी निवडून दिल्यानंतर त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व मतदारावरच अन्याय होतो. याचा अनुभव आपल्याला नेत्यांकडून आलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्या सारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. हे ओळखून आपण राव यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. सेलू नगर पालिकेची निवडणुका भारत राषट्र समिती पक्षाच्या वतीने स्वबळावर व संपूर्ण ताकदीनिशी लढवल्या जातील. जनतेच्या विचारातूनच उमेदवार निवडले जातील, असेही रहिमखान पठाण यांनी यावेळी स्पष्ट केले. मोहमद इम्रान, मिर्झा अफसर बेग, शेख इस्माईल शेख यासेर, अबू बकर खान, शेख अखिल, अब्दुल हाफिज, इस्माईल भाई, खयूम खादरी शेख जुनेद आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सेलू नगर पालिकेची निवडणुक भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने स्वबळावर व संपूर्ण ताकदीनिशी लढविली जाईल. जनतेच्या विचारातूनच उमेदवार निवडले जातील, असेही रहिमखान पठाण यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, रहिमखान पठाण यांनी वेगळी वाट धरली असली, तरी या प्रयोगात ते किती यशस्वी ठरतील, हे येणारा काळाच दाखवून देईल,असे बोलले जात आहे.
हेही वाचा : अर्थसंकल्प : आर्थिक स्थिरता, संपन्नता देणारा : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर