सेलूचा श्रीराम जन्मोत्सव : आज शोभायात्रा, श्रीरामसाईंचा पालखी सोहळा, नगरभोजन
सेलू शहरासह गावखेड्यात उत्साहाचे वातावरण, रामनामाने चैतन्य फुलले
सेलू जि.परभणी : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम जन्मोत्सव समिती व समस्त सेलूकरांच्या वतीने सकाळी आठ व दुपारी चार वाजता शोभायात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे आठवे वर्ष आहे. यानिमित्ताने सेलू शहरासह गावखेड्यात उत्साहाचे वातावरण असून, रामनामाने चैतन्य फुलले आहे.
सकाळी आठ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. श्री रोकडिया हनुमान मंदिर, मोंढा येथे समारोप होईल. शोभायात्रेत प्रभु श्रीरामची भव्य मूर्ती, श्री साईंची पालखी, उज्जैन महाकाल येथील प्रसिद्ध झांजपथक, हरियाणा येथील रूद्ररुपी बजरंगबलीचा सजीव देखावा, उज्जैन येथील बाबा महाकाल श्रृंगाररूपी शिवलिंग दर्शन, रणरागिणी ध्वज पथक, मुलींचे लेझीम पथक, आठ फुटी नंदी महाराजांवर विराजमान भगवान श्री शिवशंकर, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार, कृष्ण अर्जुन गीता उपदेश, भगवान परशुराम सजीव देखावा, श्री विठ्ठल रुक्मीनी सजीव देखावा, वारकरी मंडळी, वानरसेना, महिला भजनी मंडळ, थोर महापुरूषांचे सजीव देखावा, घोडे, उंट व शिवकालीन खेळांचा देखावा आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. दुपारी चार वाजता प्रभु श्रीराम, श्री साईंची भव्य मिरवणूक व पालखी सोहळा आहे. मिरवणूक व शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सेलू शहरातील सर्व नागरिक नगरभोजनामध्ये आपापल्यापरीने योगदान देतात. महिला भगिनी घरून पोळ्या करून आणून देतात. यासाठी पीठाच्या पाच-पाच किलोच्या बॅग वाटपाला मंगळवारी (२८ मार्च) सुरुवात झाली. गुरूवारी दहा वाजेपर्यंत पोळ्या मंदिरात महिलांनी पोहोचती करव्यात अथवा संयोजन समिती घरपोच येऊन पोळ्या एकत्र करतील. बुधवारी (२९ मार्च) प्रसादरूपी बेल वृक्षाचे रोप घेण्यासाठी महिला भगिनींनी एकच गर्दी केली. गुरुवारी (३० मार्च) शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. श्रीराम जन्मोत्सवानंतर नगरभोजन महाप्रसाद आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेलाच्या दोन हजार रोपट्यांनी सजले अंगण
साईबाबा मंदिरात विनोद बोराडे मित्रमंडळाच्यावतीने बुधवारी (२९ मार्च) बेल वृक्षाच्या दोन हजार रोपट्यांचे वाटप करण्यात आले. या साठी महिला भाविकांची झुंबड उडाली होती. गुढी पाडवा व श्रीराम जन्मोत्सवानिमित्त २३ मार्चपासून साईबाबा मंदिरात आयोजित श्रीमद् भागवत कथा व साई कीर्तन महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. नामवंत कीर्तनकारांनी महोत्सवात हजेरी लावली.बुधवारी दुपारी कथाकार नंदकिशोर पुराणिक महाराज यांचा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईराज बोराडे, शंकर राऊत, प्रभाकर सुरवसे, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र पवार, विजया बोराडे, नयन बोराडे, उर्मिला बोराडे आदींची उपस्थिती होती.
…यांच्या गुढ्या ठरल्या सुंदर
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धेतील विजेत्या मीरा नंदकिशोर बहिवाल (प्रथम), मुक्ता राम मोटे (द्वितीय), प्रीती भगीरथ सोळंके (तृतीय), प्रतिक्षा रविंद महाजन (उत्तेजनार्थ), तसेच प्रोत्साहनपर पूजा सरकाळे, पूजा धोंगडे, आशा जोरगेवार, उर्मिला गाडेकर, प्रेक्षा ससाणे, मीरा संगेकर, शिवकन्या जाधव, पूजा दाळवे, राधा गव्हाडे यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. परीक्षक किशोर कटारे, प्रणिता सोलापुरे, गीता मुळावेकर, प्रिती राठी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक गंगाधर कान्हेकर, सूत्रसंचालन गिरीश लोडाया, रवि मुळावेकर यांनी केले. गुरुवारी (३० मार्च) शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन, श्रीराम जन्मोत्सव, महाआरतीनंतर नगरभोजन (महाप्रसाद) आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
ठिकठिकाणी उत्साह
श्रीरामनवमीनिमित्त शहरात बुधवारपासून ठिकठिकाणी उत्साह दिसून येत. विविध ठिकाणच्या मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली आहे. शहरातील प्राचीन श्रीराम मंदिरात पांरपरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय विविध भागातील मंदिरातही जन्मोत्सवाची तयारी झाली आहे. भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे.
सेलूच्या भूमिपूत्राचा सन्मान : डॉ.संजीव देशमुख यांची शासकीय अभियांत्रिकी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी
खासदार जाधवांना ‘वाय’ सुरक्षा द्या; शिवसेना ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन
श्रीराम जन्मोत्सव : कीर्तनात सेलूकर दंग; गुरूवारी शोभायात्रा, पालखी सोहळा, नगरभोजन
श्रीकालिकादेवी यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी, विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद