सेलूच्या भूमिपूत्राचा सन्मान : डॉ.संजीव देशमुख यांची शासकीय अभियांत्रिकी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

सेलूच्या भूमिपूत्राचा सन्मान : डॉ.संजीव देशमुख यांची शासकीय अभियांत्रिकी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नियामक मंडळाचे  राज्यशासनाकडून गठण, प्रसाद कोकीळ, सूरज दुमने यांचा शासन नियुक्त सदस्यांत समावेश

सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आयआयटी (दिल्ली) येथील यंत्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ.संजीव गोविंदराव (एस.जी.) देशमुख यांची, तर सदस्यपदी संजय ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद कोकीळ (छत्रपती संभाजीनगर) आणि औरंगाबाद इंडस्ट्रीयल सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष सूरज दुमने यांची राज्यशासनाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.‌

राज्यातील जळगांव, कराड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व चंद्रपूर या स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधील नियामक मंडळे शासनाकडून नव्याने गठीत करण्यात आली आहेत. या नियुक्ती संदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाचे अवर सचिव विनोद दळवी यांनी २४ मार्च रोजी जारी केला आहे. शासनाद्वारे नियुक्त अध्यक्ष व दोन सदस्य या व्यतिरिक्त सदस्य म्हणून संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून कमाल दोन जणांची शिक्षकांचे प्रतिनिधी‌, तर एका उद्योजक अथवा शिक्षणतज्ज्ञांची सदस्य म्हणून निवड करण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे एक सदस्य; या शिवाय राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, तसेच संबंधित विद्यापीठाद्वारा नियुक्त एक सदस्य नियामक मंडळात असतो, तर पदसिध्द सचिव म्हणून संस्थेचे संचालक अथवा प्राचार्य काम पाहतात. नियामक मंडळावरील पदसिद्ध सदस्य वगळता इतर सदस्यांच्या नियुक्तीच्या कालावधीची गणना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात येईल आणि सदर सदस्यांचा कालावधी सर्वसाधारणपणे दोन वर्षे इतका असेल.‌ नियामक मंडळांच्या बैठकांसाठी तथा संस्थेच्या निगडीत अन्य कामकाजासाठी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष तथा सदस्य यांना महाराष्ट्र राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकार्‍यास देय असणार्‍या प्रवासाच्या सवलती, प्रवास भत्ता व बैठकभत्ता देय राहतील, असे शासन निर्णयात नमूद आहे.

डॉ.संजीव देशमुख यांचा परिचय

डॉ.संजीव गोविंदराव देशमुख हे मराठवाड्याचे सुपुत्र असून सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. नूतन विद्रायालयातील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक स्वातंत्र्यसैनिक स्व. गोविंदराव देशमुख गुरूजी यांचे ते सुपुत्र आहेत. सध्या ते आयआयटी दिल्लीच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून बीटेक (मेक इंजिनीअर), एमटेक आणि पीएचडी पदवी मिळवली. १९९० पासून आयआयटी दिल्ली येथे डॉ.देशमुख सेवेत आहेत. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये पुरवठा साखळी व्यवस्थापन, गुणवत्ता, उत्पादन स्पर्धात्मकता, मॉडेलिंग आणि सिम्युलेशन यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३२ वर्षांपेक्षा जास्त अध्यापन, संशोधन आणि सल्लागार अनुभव आहे. ISME (इंडियन सोसायटी ऑफ मेक.इंजि.) IIIE (इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंडस्ट्रियल इंजि.), ASI (एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया) आणि QCFI (क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया) चे सदस्य आहेत. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या युरोपियन-इंडिया उपक्रमाशी ते संबंधित होते. त्यांनी अनेक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) आयोजित केले आहेत.

इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे (FNAE) आणि इंटरनॅशनल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे (IETI) डॉ.देशमुख फेलो आहेत. त्यांनी अमेरिकन सोसायटी फॉर क्वालिटी (एएसक्यू) कडून प्रशंसा प्रमाणपत्र देखील मिळवले आहे. अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या  संपादकीय मंडळांवर ते होते. जोखीम, व्यवस्थापन, सुरक्षा आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत MSD17 (व्यवस्थापन प्रणाली) च्या क्षेत्रीय समितीचे ते अध्यक्ष आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी बोर्ड ऑफ गव्हर्नन्स रायचूर (कर्नाटक) यूजीसीचे (विद्यापीठ अनुदान) ते सदस्य आहेत. नवीन शैक्षणिक धोरण इंटर्नशिपसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. NPTEL (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निग) मध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

डॉ.संजीव गोविंदराव देशमुख हे मराठवाड्याचे सुपुत्र असून सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. नूतन विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक स्व. गोविंदराव देशुमुख गुरूजी यांचे ते सुपुत्र आहेत. सध्या ते आयआयटी दिल्लीच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून आहेत. त्यांच्याकडे ३२ वर्षांपेक्षा जास्त अध्यापन, संशोधन आणि सल्लागार म्हणून अनुभव आहे. यांत्रिकी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध  राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय संस्था आणि केंद्र व राज्यशासन पुरस्कृत विविध उपक्रमांत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.डॉ.संजीव देशमुख यांची छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली निवड सेलूकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. या निवडीबद्दल सर्वस्तरातून डॉ.देशमुख यांचे अभिनंदन होत आहे. 


चित्रकला स्पर्धेत सान्वी, क्षितिजा, दुर्गा विजेत्या; सेलूतील नूतन शाळेचा उप्रकम

खासदार जाधवांना ‘वाय’ सुरक्षा द्या; शिवसेना ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन

श्रीराम जन्मोत्सव : कीर्तनात सेलूकर दंग; गुरूवारी शोभायात्रा, पालखी सोहळा, नगरभोजन

श्रीकालिकादेवी यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी, विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Please Share

One thought on “सेलूच्या भूमिपूत्राचा सन्मान : डॉ.संजीव देशमुख यांची शासकीय अभियांत्रिकी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!