नवोदितांनी गांभीर्याने व्यक्त व्हावे : देविदास फुलारी; ‘मसाप’तर्फे देविदास कुलकर्णींना अभिवादन
परभणीत कार्यक्रम, मान्यवरांसह साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती
परभणी : नवोदित कवींनी खूप वाचले पाहिजे. अनुभव पूर्णपणे पचवून व्यक्त झाले पाहिजे. निर्मितीकडे अत्यंत गांभीर्याने पाहाणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ कवी देविदास फुलारी यांनी व्यक्त केले.
परभणी येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने साहित्य, सांस्कृतिक चळवळीतील निष्ठावान मार्गदर्शक कार्यकर्ते देविदास कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी, २२ मेरोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात फुलारी यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसाप शाखेच्या अध्यक्षा सरोज देशपांडे होत्या. ‘कवितेची निर्मिती प्रक्रियाः एक दृष्टीक्षेप’ हा फुलारी यांच्या व्याख्यानाचा विषय होता. फुलारी यांनी रामायण, महाभारत व संत साहित्यातील अनेक महत्त्वपूर्ण दाखले देत, कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवली. संत जनाबाई यांच्या अभंगातून स्त्री जाणीवेची अत्यंत उन्नत अशी अभिव्यक्ती झाल्याचे ते म्हणाले. आकाशात एखादी वीज चमकून जावी, तशी कविता मनात अकस्मात अवतरते, असे फुलारी म्हणाले. महाकाव्यापासून ते आजपर्यंतच्या कवितेचा इतिहास पाहिला, तर श्रेष्ठ कवितेचा जन्म हा वेदनेतून होतो.चांगल्या कवितेच्या बुडाशी वेदनाच असते, असे फुलारी म्हणाले. यावेळी फुलारी यांनी देविदास कुलकर्णी यांच्या साहित्य चळवळीतील कार्याचा आढावा घेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा दिला. समारोप सरोज देशपांडे यांनी केला. प्रारंभी देविदास कुलकर्णी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ कवी केशव बा. वसेकर, तुकाराम खिल्लारे, सुनंदा कुलकर्णी, डॉ.आसाराम लोमटे, रमाकांत कुलकर्णी, भास्करराव ब्रम्हनाथकर, संजय कुलकर्णी, बा.बा.कोटंबे, अरूण चव्हाळ, त्र्यंबक वडसकर, सुरेश हिवाळे, माणिक रासवे, मसाप शाखेचे पदाधिकारी व कुलकर्णी कुटुंबीयासह साहित्य रसिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कवी मोहन कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन मारोती डोईफोडे, तर आभार प्रा.भगवान काळे यांनी मानले.
देविदास फुलारी म्हणाले,” महाकाव्यापासून ते आजपर्यंतच्या कवितेचा इतिहास पाहिला, तर श्रेष्ठ कवितेचा जन्म हा वेदनेतून होतो. चांगल्या कवितेच्या बुडाशी वेदनाच असते.” या वेळी फुलारी यांनी देविदास कुलकर्णी यांच्या साहित्य चळवळीतील कार्याचा आढावा घेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा दिला.
सेलूतील रामदासी कीर्तन शिबिर उत्साहात; विविध पुरस्कारांचे वितरण
विरोधकांचा आवाज दडपविणे थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन, जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा
तळागाळातील लाभार्थींपर्यंत शासकीय योजनांचा लाभ द्या : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
१९ डब्ब्यांसह धावली नगरसोल एक्स्प्रेस, प्रवाशांच्या मागणीला यश